Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहादवाडी–नागाळा रोडवरील वन्यजीव दहशत संपुष्टात शोभाताई फडणवीस यांच्या तत्पर हस्तक्षेपाने रस्ता एका...

महादवाडी–नागाळा रोडवरील वन्यजीव दहशत संपुष्टात शोभाताई फडणवीस यांच्या तत्पर हस्तक्षेपाने रस्ता एका दिवसात झाला मोकळा

मूल, प्रतिनिधी :
महादवाडी ते नागाळा रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघ व बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिक, विशेषतः शाळकरी मुलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यालगत वाढलेला कचरा आणि जंगली झुडपे यामुळे वन्यप्राण्यांच्या वावरास अनुकूल वातावरण तयार झाले होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत स्थानिक युवकांनी पुढाकार घेत तातडीने स्वच्छता मोहिम सुरू केली.

युवक देवानंद पेंन्दोर, जयस्वाल पेंन्दोर, ज्ञानेश्वर पिल्लरवार, अजय मोहुरले, नवनाथ पेंन्दोर, सचिन मंदाडे, किरण टेकाम आणि अमृत शेंडे यांच्या पुढाकारामुळे रस्त्याच्या कडेला असलेले कचरा आणि झुडपे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, नागाळा येथील तरुण सामाजिक कार्यकर्ता गौरव पिल्लरवार यांनी ही गंभीर बाब जाणून घेत त्वरित माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्याशी संपर्क साधला.

घडलेल्या परिस्थितीची माहिती मिळताच शोभाताई फडणवीस यांनी संबंधित विभागांना तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या हस्तक्षेपाला तत्पर प्रतिसाद देत वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तरीत्या महादवाडी–नागाळा रोडवरील कचरा हटविणे, झुडपे छाटणे आणि मार्ग मोकळा करण्याची मोहीम हाती घेतली. केवळ एका दिवसात रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील कचरा व झुडपे हटवल्याने संभाव्य अपघाताचा धोका कमी झाला आहे.

या कार्यवाहीत चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसकर यांनी विशेष पुढाकार घेतला. युवकांच्या सहकार्याने झुडपे छाटण्याचे काम युद्धपातळीवर करून रस्ता पूर्णतः मोकळा करण्यात आला.

वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालीमुळे निर्माण झालेली भीती दूर होऊन आता नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शोभाताई फडणवीस यांच्या तत्परतेचे तसेच स्थानिक युवकांच्या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एक संभाव्य धोका टळला असून प्रशासनालादेखील योग्य दिशेने कार्यवाही करण्यास हातभार लागला आहे.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular