Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमूलमध्ये भाजपचा डाव फसला; काँग्रेस ठरली वरचढ उमेदवाराऐवजी आ.सुधीर मुनगंटीवारांना पुढे करणे...

मूलमध्ये भाजपचा डाव फसला; काँग्रेस ठरली वरचढ उमेदवाराऐवजी आ.सुधीर मुनगंटीवारांना पुढे करणे भोवले

मूल : मूल नगरपरिषद निवडणुकीत भाजपने आखलेली राजकीय रणनीती अखेर फसली असून काँग्रेसने निर्णायक आघाडी घेत सत्ता काबीज केली आहे. उमेदवारां ऐवजी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना थेट प्रचारात पुढे करून भाजपने निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णयच पक्षाला अडचणीचा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपकडून उभे असलेल्या उमेदवारांच्या कार्यकुशलतेपेक्षा, त्यांच्या योजनांपेक्षा किंवा स्थानिक प्रश्नांवरील भूमिकेपेक्षा आमदार मुनगंटीवार यांनी आपल्या आमदारकीतील विकासकामांचा अधिक गवगवा प्रचारात करण्यात आला. परिणामी, नगरपरिषद निवडणूक असतानाही संपूर्ण प्रचार हा आमदार मुनगंटीवार यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती केंद्रित झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे मतदारांमध्ये “ही नगरपरिषदेची निवडणूक आहे की आमदार मुनगंटीवार स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उभे राहून स्वतःसाठी मतदान मागत आहेत?” असा संभ्रमजनक वातावरण निर्माण झाले.
या परिस्थितीचा फटका भाजपच्या स्थानिक उमेदवारांना बसल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक नेतृत्वाला दुय्यम स्थान मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता होती. याउलट काँग्रेसने स्थानिक उमेदवार, शहराच्या मूलभूत गरजा आणि सर्वसमावेशक विकासाचा अजेंडा मतदारांपुढे प्रभावीपणे मांडला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, रोजगार, नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांवर काँग्रेसने थेट संवाद साधत मतदारांचा विश्वास संपादन केला.
मतदानादरम्यान भाजपच्या प्रचारात व्यक्ती-केंद्री राजकारण अधिक ठळक राहिले, तर काँग्रेसचा प्रचार स्थानिक समस्या व शहराच्या एकतेभोवती केंद्रित होता. याचाच फायदा काँग्रेसला झाला. निकालानंतर काँग्रेस समर्थकांनी जल्लोष साजरा करत हा विजय ‘स्थानिक स्वाभिमानाचा आणि नगरविकासाचा विजय’ असल्याची प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसच्या विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत, “मूल शहराची एकता अखंड ठेवून सर्वसमावेशक विकास साधण्याला प्राधान्य दिले जाईल,” अशी ग्वाही दिली. दरम्यान, भाजपच्या गोटात या पराभवाची कारणे शोधली जात असून, स्थानिक नेतृत्व आणि संघटनात्मक धोरणांवर आत्मपरीक्षण सुरू झाले आहे.
एकंदरीत, मूल नगरपरिषद निवडणूक ही भाजपसाठी व्यक्तीकेंद्रित राजकारण किती घातक ठरू शकते याचे उदाहरण ठरली, तर काँग्रेससाठी स्थानिक मुद्द्यांवर मिळालेला जनादेश मानला जात आहे.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular