मूल : नगरपरिषद निवडणुकीत मूलच्या मतदारांनी सत्ताधाऱ्यांना स्पष्ट संदेश देत आमदार सुधीर मुनगंटीवार यांना जणू आरसाच दाखविला आहे. नगराध्यक्ष पदासह एकूण २० पैकी तब्बल १८ जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवित भाजपचा सपशेल पराभव केला आहे. प्रचारादरम्यान उमेदवार निवडून न आल्यास निधी दिला जाणार नाही, अशा प्रकारचे भाष्य आमदार मुनगंटीवार यांनी पहिल्याच प्रचार सभेत केल्याचे बोलले जात होते. मात्र, हीच धमकी मतदारांना न पटल्याने ती अखेर भाजपसाठी अंगलट ठरल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे.
नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राज्यातील वजनदार नेते म्हणून ओळख असलेल्या आमदार मुनगंटीवार यांनी प्रचारात स्वतः उतरून विकासनिधीचा मुद्दा मांडत अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र मूलच्या मतदारांनी विकास हा हक्क आहे, तो कोणाच्या दयेवर अवलंबून नसावा, असा ठाम संदेश देत मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावला.
मूल नगरपरिषद निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत नव्हती, तर आमदार मुनगंटीवार यांच्या राजकीय ताकदीची कसोटी मानली जात होती. राज्यातील ‘हेवीवेट’ नेते म्हणून ओळख असलेल्या आमदारांनी विकासनिधीच्या नावावर मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, विकास हा लोकांचा हक्क आहे, भीक नाही हे मूलच्या मतदारांनी मतदानातून ठणकावून सांगितले.
निकालानंतर नगराध्यक्ष पदासह बहुसंख्य प्रभागांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला. भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. हा निकाल केवळ नगरपरिषद निवडणुकीपुरता मर्यादित नसून, आगामी काळातील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या निकालानंतर मोठा उत्साह संचारला असून शहरात जल्लोष करण्यात आला. काँग्रेस नेत्यांनी हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि सत्तेच्या दडपशाहीला दिलेल्या उत्तराचा असल्याचे सांगितले. दुसरीकडे भाजपकडून मात्र पराभवाची कारणे शोधण्याचे प्रयत्न सुरू असून आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली जात आहे.
एकूणच मूल नगरपरिषद निवडणुकीतून मतदारांनी स्पष्ट केले की, विकासाच्या नावाखाली धमक्या नव्हे तर कामगिरीवरच जनतेचा कौल ठरतो. आमदार मुनगंटीवार यांच्यासाठी हा निकाल नक्कीच राजकीय इशारा मानला जात आहे.



