मूल : संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात व भक्तीमय वातावरणात नुकतीच साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन जाम खुर्द येथील सरपंच बंडू बुरांडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून नामदेव चलाख यांनी तर मार्गदर्शक म्हणून आशिष देवतळे यांनी तर या जयंती सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उथळपेठ येथील सरपंच पालिंद्र सातपुते, पोलिस पाटील राजू कोसरे, शशिकांत गणवीर, नामदेव लेंनगुरे, सामाजिकप्रदीप वाढई, विजय गुरुनुले, सरदार वाढई, जालिंद्र मोहुर्ले, संजय गुरनुले आणि रामदास देवतळे, शितल वाढई,आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात संतांच्या कार्याचा व त्यांच्या सामाजिक विचारांचा उजाळा दिला. समाजातील ऐक्य, शिक्षण, समता आणि श्रमाची प्रतिष्ठा या मूल्यांवर संत जगनाडे महाराजांनी दिलेले मार्गदर्शन आजही तितकेच महत्त्वाचे असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
मार्गदर्शक आशिष देवतळे यांनी संत जगनाडे महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, संतांनी आयुष्यभर समाजातील दुर्बल, वंचित, शोषित घटकांच्या उन्नतीसाठी काम केले. श्रमाला प्रतिष्ठा देणे, सत्य, अहिंसा, समता व परस्पर प्रेम ही मूल्ये समाजात रुजविण्यास त्यांनी आयुष्य वाहिले. संत तुकाराम महाराजांचे शिष्य म्हणून भक्ति चळवळीत त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या अभंगांमधून समाजजागृतीचे संदेश आजही प्रेरणादायी ठरतात. मेहनत, प्रामाणिकपणा व समाजसेवा हीच खरी पूजा असल्याचा संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिला, असे देवतळे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील युवकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचलन किशोर ढोडरे यांनी तर आभार प्रदर्शन अंकुश देवतळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नारायण टिकले, विलास ढोडरे, नितेश भुरसे,गौतम चलाख, आदींनी परिश्रम घेतले.



