मूल प्रतिनिधी : गावाच्या विकासाचा नारा देणाऱ्या काही राजकीय पुढाऱ्यांनीच स्वतःच्या फायद्यासाठी गावात दारूचे दुकान थाटल्याने भेजगाव परिसरात व्यसनाधिनतेचे सावट गडद झाले आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या दुकानामुळे भेजगावसह सिंतळा, येरगाव, पिंपरी दीक्षित, रेगडी, चकघोसरी, येजगाव, दुगाळा, चक दुगाळा, भजाळी, हळदी, दहेगाव, मानकापूर आणि चिचाळा या गावांवरही परिणाम झाला असून, अनेक कुटुंबांत कलह, तणाव आणि सामाजिक अध:पतन वाढले आहे.
गावाचा विकास करण्याऐवजी स्वतःचा आर्थिक विकास साधणाऱ्या पुढाऱ्यांवर नागरिकांत तीव्र रोष व्यक्त होत आहे. विशेषतः महिलांमध्ये संतापाची लाट असून दारूबंदीची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या व्यसनाधिनतेमुळे भेजगावात एकाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून एका दारुड्या तरुणाने पत्नीला मारहाण करून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मागील महिन्यातही अशाच स्वरूपाची घटना घडली होती. येजगाव येथील महिला बचत गटाकडून शेतीसाठी घेतलेले ३३ हजार रुपये एका तरुणाने दारू व जुगारात उधळले होते. इतकेच नव्हे, तर भेजगावात घरकुलासाठी वडिलांनी आणून ठेवलेले लोखंडी साहित्य देखील दारूच्या नशेखातर विकल्याची चर्चा गावात आहे.
दारूच्या व्यसनामुळे या भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक अवस्था ढासळली असून, सामाजिक प्रतिष्ठा व नातेसंबंधही तुटण्याच्या मार्गावर आहेत. चिचाळा–सुशी–दाबगाव जिल्हा परिषद क्षेत्रात दारूचे दुष्परिणाम स्पष्टपणे जाणवत असून, गावागावांत या समस्येविरुद्ध ग्रामस्थांनी एकत्र येऊन चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. दारूच्या नशेत बुडणारे संसार आणि मोडकळीस आलेली सामाजिक रचना — यावर आता तरी गावकऱ्यांनी जागे व्हावे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



