मूल, प्रतिनिधी :
मूल तालुक्यातील चिचाळा, सुशी, दाबगाव आणि केळझर जिल्हा परिषद क्षेत्रात यंदा भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील ओबीसी मतदारसंघाचा प्रभाव लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी जातीय समीकरण साधण्याच्या प्रयत्नांना वेग दिला असून, राजकीय वर्तुळात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे.
काँग्रेसकडून बाजार समितीचे संचालक हसन वाढई यांचे सुपुत्र सौरभ वाढई यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सौरभ वाढई हे तरुण, ऊर्जावान आणि स्थानिक स्तरावर सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. या मतदारसंघात माळी समाज बहुसंख्य असल्याने काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाला तिकीट न देता ओबीसी प्रवर्गातील युवा नेतृत्व सौरभ वाढई यांच्यावर विश्वास दाखवण्याची शक्यता आहे. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस ओबीसी मतदारांना एकवटण्याच्या रणनीतीवर भर देत आहे.
दरम्यान, भाजपकडून पालिंद्र सातपुते यांचे नाव आघाडीवर असल्याचे चर्चेत आहे. सातपुते हे उथळपेठ येथील दोन टर्म सरपंच राहिले असून शांत, सयमी आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते तेली समाजाचे असून हा समाज या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भाजपकडून सातपुते यांना उमेदवारी मिळाल्यास जातीय समीकरणाच्या आधारे त्यांचे पारडे जड ठरू शकते, त्यामुळे या क्षेत्रात भाजपा कडून उमेदवारी मिळ्न्यास पालिंद्र सातपुते यांची बाजू भक्कम असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.
भाजपच्या उमेदवार निवडीसाठी १२ नोव्हेंबरपासून अंतर्गत सर्वेक्षण सुरू होणार आहे. यात “मीच सर्वोत्तम उमेदवार” हे दाखविण्याकरिता पक्षांतर्गत चढाओढ निर्माण झाली आहे. काही भाजपच्या संभाव्य उमेदवार कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी आर्थिक ताकद वापरत असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर चिचाळा–सुशी–दाबगाव–केळझर जिल्हा परिषद क्षेत्रात भाजप आणि काँग्रेस यांच्यातील थेट लढत अत्यंत चुरशीची ठरणार असून, ओबीसी समाजाच्या मतांची एकजूट या निवडणुकीतील निकालाचा निर्णायक घटक ठरणार आहे.



