शेतकऱ्यांनो सावधान!
मुल : मूल तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील धानकापणी आता अंतिम टप्प्यात आहे. काहीच दिवसांत धान मळणी होणार असल्याने शेतकरी आपल्या मेहनतीच्या पिकाचे मोजमाप करून विक्री नियोजनात गुंतले आहेत. तालुक्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने धानहंगामात लाखो रुपयांची उलाढाल होते. या पार्श्वभूमीवर विविध व्यापाऱ्यांमध्ये धान खरेदीची चढाओढ सुरू होतेच; मात्र याच स्पर्धेत अनेक ठिकाणी वजनकाट्यातील हेराफेरीचे प्रकार वाढले असून शेतकऱ्यांची सर्रास लूट केली जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
मागील वर्षी मुल तालुक्यात अशा अनेक घटना प्रकाशात आल्या होत्या. अधिक दराचे आमिष दाखवून व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचत होते. “जास्त दर देतो, ओझे उचलून नेतो,” अशा गोड बोलांनी शेतकऱ्यांना आकर्षित केले जात होते. मात्र प्रत्यक्षात वजनकाट्यावर फेरफार करून प्रतिक्विंटल २ ते ५ किलोपर्यंत कमी वजन दाखवले जात होते. दिवसाला शेकडो क्विंटलची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ही ‘सूक्ष्म हेराफेरी’ मोठा पैसा कमावण्याचे साधन बनली. याचा फटका मात्र थेट शेतकऱ्यांच्या कष्टावर बसला.
काही शेतकऱ्यांनी तर मागील वर्षी आपले नुकसान उघड करताना व्यापाऱ्यांनी वापरलेल्या वजनकाट्यावरचे दोष, लपविलेले मॅग्नेट, चुकीची तराजू-मापे यांचे फोटो व व्हिडिओही पुराव्यासह दाखवले होते. परंतु अनेक शेतकरी कमी माहिती, तातडीचा विक्री दबाव आणि अधिक दराच्या लालचेपोटी अजूनही अशा व्यवहारांना बळी पडतात.
कृषी विभागानेही गेल्या हंगामात व्यापाऱ्यांवर कारवाईची चेतावणी दिली होती; परंतु गावे-खेड्यांमध्ये फिरून होणारी थेट खरेदी पूर्णपणे नियंत्रणात आणणे कठीण ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः सतर्क राहण्याची गरज अधिक निर्माण झाली आहे. म्हणूनच, शेतकऱ्यांनी थेट शेतदारी येणाऱ्या ‘जास्त दराच्या’ आमिषाला बळी न पडता आपले धान अधिकृत बाजार समितीतच विक्री करावी. हेच शेतकऱ्यांना सुरक्षित, पारदर्शक आणि फायद्याचे ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कष्टाने पिकवलेल्या धानाचे योग्य मोल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सावध राहून सुजाण निर्णय घेण्याची गरज आहे.



