यशोदा सीड्स ने केली धान उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक — किसान मोर्चाची पोलिस ठाण्यात तक्रार
मूल : यशोदा सिड्स कंपनीच्या नोवा-145 वाणामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या संदर्भात सोमवारी (दि.२७)भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तर्फे पोलीस स्टेशन, मूल येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे
बंडू मधुकर गौरकार यांनी या वाणाविषयी तक्रार केली होती. कंपनीच्या जाहिरातीनुसार हे वाण 145 ते 150 दिवसांत पूर्ण वाढते व कापणीयोग्य होते, असे सांगितले गेले होते. मात्र प्रत्यक्षात या वाणाच्या शेतीत 90 ते 100 दिवसांत काही धानाला फुलोरा येतो, तर 110 ते 120 दिवस उलटूनही अनेक ठिकाणी अजून फुलोरा आलेला नाही, असे आढळले आहे.
कृषी विभागाच्या पाहणी अहवालानुसार संबंधित बियाण्यात 35 ते 40 टक्के भेसळ असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे गंभीर आर्थिक नुकसान झाले आहे.
या तक्रारीची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभागास निर्देश दिले आहेत की संबंधित कंपनीविरुद्ध सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच, किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मूल पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार देत कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
किसान मोर्चाने स्पष्ट केले की —
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या यशोदा सीड्स कंपनीला सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांचे नुकसान भरून न येईपर्यंत संघर्ष सुरूच राहील.
या प्रसंगी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, चंदू मारगोनवार, रवी चहारे, प्रमोद कळसकर पलींद्र सातपुते विजय गुरनुले, गुलशन लाकडे गुरुदास भंडारे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



