मूल, प्रतिनिधी :
मूल नगरपरिषदेच्या निवडणुकीला वेग आला असून आता शहरातील सर्वात चर्चेचा प्रश्न अखेर सुटला आहे. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी एकता प्रशांत समर्थ यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी पत्नी एकता समर्थ व कार्यकर्त्यांसह काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर शहरातच नव्हे तर तालुकास्तरावरही चर्चा रंगात आली होती. समर्थ दांपत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा पक्षासाठी मोठे बळ मानला जात असून त्याचा परिपाक आज त्यांच्या उमेदवारी अर्जाच्या रूपात दिसून आला.
■ समर्थ दांपत्याचे सामाजिक कार्य ठरणार वरदान
प्रशांत समर्थ यांनी गेल्या अनेक वर्षांत दुर्गा उत्सव मंडळासह शहरात रक्तदान शिबिरे, गरजूंसाठी मदत मोहिमा, स्वच्छता अभियान असे विविध सामाजिक उपक्रम राबवले. या सर्व उपक्रमांच्या नियोजनात आणि लोकांशी संवादात एकता समर्थ यांची मोलाची भूमिका राहिली आहे. गोर-गरिबांच्या मदतीसाठी धावून येणारे आणि सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून तातडीने उपाय शोधणारे हे जोडपे लोकसंपर्कात अग्रेसर आहे.
याच सामाजिक कार्याचा भक्कम पाया लक्षात घेऊन “समर्थ कुटुंब हे केवळ राजकारणासाठी नाही, तर लोकसेवेसाठी ओळखले जाते,” अशी भावना शहरात रूजली आहे.
■ एकता समर्थ : शिक्षित, शांत स्वभावाची, सर्वांची ‘एकता ताई’
एकता समर्थ या शिक्षित, विनम्र आणि लोकांशी स्नेहभावाने वावरणाऱ्या महिला आहेत. शहरात त्यांना “सर्वांची एकता ताई” म्हणून विशेष ओळख मिळाली आहे. युवक आणि महिलांमधील त्यांची लोकप्रियता मोठी असून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन त्यावर प्रयत्नपूर्वक उपाय शोधण्याचा त्यांचा स्वभाव लोकांच्या मनात घर करून बसला आहे.
■ उमेदवारी अर्ज दाखल होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
आज एकता समर्थ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. “मूल शहराला एक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख नगराध्यक्षा देण्याचा निर्धार आम्ही केला आहे,” अशा भावना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
■ नागरिकांत सकारात्मक चर्चेला उधाण
अर्ज दाखल झाल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये चर्चेचा एकच सूर घुमत आहे —
“समर्थचं सामाजिक कार्य ठरणार; ऐक्यताचं सामर्थ्य!”
अनेक नागरिकांचा विश्वास आहे की, सामाजिक कार्य, लोकसंपर्क आणि समर्थ कुटुंबाची प्रतिमा यांच्या जोरावर एकता समर्थ या निवडणुकीत चांगली आघाडी घेऊ शकतात. एकता समर्थ यांच्या उमेदवारी अर्जानंतर काँग्रेसची निवडणूक रणनीती अधिक बळकट झाली असून, आता त्यांच्या प्रचाराकडे आणि प्रतिस्पर्धी पक्ष कोण उभा करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



