मूल :
आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार प्रा. डॉ. किरण किशोर कापगते यांच्या प्रचाराला आता जोमदार सुरुवात झाली असून त्यांच्या स्वच्छ, पारदर्शक आणि सुसंस्कृत प्रतिमेमुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हे मजबूत गढ मानले जाते. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी मुल शहराचा चेहरामोहरा पालटणारी विकासकामे करून शहराची दिशाच बदलली. रस्ते, ड्रेनेज, सभागृह, क्रीडा संकुल, रुग्णालय आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत शहराचा सर्वांगीण विकास साधला.
मागील चार वर्षांपासून नगरपरिषदेत प्रशासकीय राजवट असतानाही आमदार मुनगंटीवार यांनी मुल शहराला प्राधान्य देत सातत्याने निधी उपलब्ध करून दिला. शहर स्वच्छतेच्या टेंडरची मुदत संपल्यावर एक्स्टेंशन मिळवून देण्यासह तातडीच्या कामांना नेहमीच गती दिली.
सध्या केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना स्थानिक स्तरावरही सत्ता मिळाल्यास विकासाला अधिक चालना मिळू शकते, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. आतापर्यंत ज्या झपाट्याने मुलमध्ये विकास झाला आहे, त्यापेक्षा व्यापक विकास भविष्यात होण्याची अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे सार्वजनिक मतमतांतरण भाजपकडे झुकत असल्याचे चित्र उमटत आहे.
याच पार्श्वभूमीवर सुसंस्कृत, सुशिक्षित आणि समाजाभिमुख उमेदवार म्हणून प्रा. डॉ. किरण कापगते यांना मैदानात उतरवून भाजपने विजयाचा मार्ग अधिक सुकर केला असल्याची भावना व्यक्त होत आहे. “मुनगंटीवार यांनी दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले,” असा जनतेत ठाम विश्वास असून त्याच विश्वासाची ताकद कापगते यांच्या प्रचाराला अधिक बळ देत आहे.



