मूल : चिचाळा-सुशीदाबगाव तसेच केळझर जिल्हा परिषद क्षेत्रात आगामी निवडणुकीत भाजपा पक्षाकडून जातीय समीकरण साधत उमेदवारीची चर्चा रंगात आली आहे. या गणातील आरक्षण सर्वसाधारण झाल्याने अनेक इच्छुकांच्या भुवया उंचावल्या असून, दावेदारीसाठी स्पर्धा चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
या पार्श्वभूमीवर उथळपेठ येथील दोन टर्म सरपंच राहिलेल्या पालिंद्र सातपुते हे कार्यकर्त्यांच्या पसंतीचे प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहेत. गरिबीतून सामान्य कुटुंबात वाढलेले आणि आपल्या मेहनतीवर राजकारणात स्थान निर्माण केलेले सातपुते यांचे नाव कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाने घेतले जाते.
दरम्यान, काही श्रीमंत इच्छुकांनीही या क्षेत्रातून भाजपाचे तिकीट मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपात प्रवेश केलेल्या एका व्यक्तीने पैशांच्या जोरावर तिकीट मिळविण्यासाठी पक्षात लोटांगण घालण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. मात्र, पक्षनिष्ठा व कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याला प्राधान्य देणारा पक्ष असल्याने “पैसे श्रेष्ठ की कार्यकर्त्याची निष्ठा” याचा निकाल काळच लावणार आहे.
पालिंद्र सातपुते हे दोनदा सरपंच आणि एकदा उपसरपंच म्हणून कार्यरत राहिले आहेत. सुशी-केळझर गण भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. विशेष म्हणजे, ते विद्यमान आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे दत्तक गाव उथळपेठाचे सरपंच राहिले असून, सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
गावात ग्रामपंचायतीच्या वाईट हाऊसच्या धर्तीवरील आकर्षक प्रशासकीय इमारत उभारण्यात आली असून, गायमुख देवस्थान परिसरात वन विभागाच्या सहकार्याने सुंदर गार्डन विकसित करण्यात आले आहे. या ठिकाणाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच संपूर्ण गाव “हर घर सोलर” या योजनेखाली झळकू लागले आहे.
शिक्षित, तरुण आणि उमदे नेतृत्व असलेल्या पालिंद्र सातपुते यांनी क्षेत्रात विविध समाजघटकांमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. तेली, माळी, इतर मागास समाजातील लोकांशी उत्तम संपर्क राखत त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले आहे.
सातपुते यांनी ‘जनतेत राहून जनतेची सेवा करणे हेच माझे ध्येय आहे. संधी मिळाल्यास विकास आणि पारदर्शकतेचे आदर्श उभे करू,’ अशी भावना व्यक्त केली आहे.
भाजपात प्रबळ निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे सातपुते यांना सुधीरभाऊंचा विश्वास लाभलेला आहे. सुधीरभाऊ स्वतःही अनेक भाषणांत “गरीब असो वा श्रीमंत — पक्षनिष्ठ, लोकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच प्राधान्य दिले जाईल,” असे सांगत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर सुशी-केळझर गणातील आगामी निवडणुकीत पालिंद्र सातपुते यांच्या दावेदारीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पैसा जिंकतो की कार्यकर्त्यांची निष्ठा? — याचे उत्तर निकाल पेटीतूनच मिळणार आहे. एवढे मात्र निश्चित!



