मूल : मूल तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच रंगू लागले आहे. चिचाळा आणि सुशीदाबगाव या प्रभागांतून विजय गुरनुले व गुलशन लाकडे यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी दावेदारी दाखल केली असून, या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यातील चिचाळा पंचायत समिती प्रभाग सर्वसाधारण वर्गासाठी तर सुशीदाबगाव प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने, या दोन्ही ठिकाणी स्थानिक पातळीवर राजकीय चुरस अपेक्षित आहे
विजय गुरनुले हे स्थानिक पातळीवर विकासकामांत सक्रिय असून, त्यांनी गावातील रस्ते, पाणीपुरवठा व सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आहे. तर गुलशन लाकडे यांनी अनुसूचित समाजातील युवकांना एकत्र करून पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत केली आहे. दोघेही पक्षाचे निष्ठावंत व कार्यक्षम कार्यकर्ते मानले जातात.
या दावेदारीनंतर चिचाळा व सुशीदाबगाव परिसरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला. वरिष्ठ कार्यकर्त्यांनी दोघांनाही शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
भाजपच्या अंतर्गत बैठकीत या दोन्ही नावांवर सकारात्मक चर्चा होत असल्याचे समजते. पक्षाकडून अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. ग्रामीण मतदारांमध्येही या दोघांविषयी चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “या तरुण व विकासाभिमुख नेतृत्वामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



