सामाजिक कार्यकर्त्याने दाखवली तत्परता
मूल, प्रतिनिधी :
मूल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील मूल ते केसलाघाट हा रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला असून, दररोज या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या दुरावस्थेमुळे अनेक प्रवासी खड्ड्यात पडून जखमी झाले असून, संबंधित विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
बुधवार (दि. ५ ऑक्टोबर) ला सुमारे पाचच्या सुमारास एका व्यक्तीने आपल्या पत्नी व मुलासह या मार्गावरून प्रवास करताना डोनी फाट्याजवळील मोठ्या खड्यात गाडी गेल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तिघेही रस्त्यावर पडून किरकोळ जखमी झाले. हा प्रकार पाहून त्या मार्गाने जात असलेले मूल येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश खियांनी यांनी तत्काळ जबाबदारी घेत, कोणाचीही मदत न घेता रस्त्यावरील चार मोठे खड्डे स्वतःच्या प्रयत्नाने बुजवले.
त्यांच्या या सामाजिक संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे येणारे–जाणारे नागरिकांनी कौतुक केले. काहींनी तर स्वतः पुढे येऊन खड्डे बुजविण्याच्या कामात त्यांना मदत केली.
सुरेश खियांनी यांनी दाखविलेल्या या सामाजिक दायित्वाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, “एखादा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार काय?” असा सवाल नागरिक करत आहेत. रस्त्यावरील वाढते अपघात व नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.



